चोपडा प्रतिनिधी । येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेचा आज दि. 2 सप्टेंबर रोजी 63 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सहाय्यक शाखाधिकारी अनिल पाटील यांनी एल.आय.सी.च्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वाघजाळेसर यांनी मनोगत सांगितले की, एलआयसी नसती तर सर्व सामान्य जनतेने जीवन संरक्षण व बचतीसाठी कोणावर विश्वास ठेवला असता ? हा संशोधनाचा विषय राहिला असता. “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” हे बिरूद एलआयसीने शब्दशः खरे करून दाखवल्याचेही त्यांनी म्हटले. याचबरोबर संजीव बाविस्कर यांनी 1956 पुर्वी भारतात साधारण 181 खाजगी विमा कंपन्या होत्या. परंतु त्या कंपन्यांचा जाच सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत होता. म्हणून भारत सरकारने 1सप्टेंबर 1956 रोजी रू.500 कोटींच्या लाईफ फंडवर एलआयसीची स्थापना करत एक रोपटे लावले. आज सर्व कर्मचारी, विकास अधिकारी व विमा प्रतिनिधींच्या मेहनतीने एक कल्पवृक्ष तयार झाला असून हा कल्पवृक्ष फक्त घेण्याचेच काम करीत नसून जास्तीत जास्त देण्याचे काम करीत आहे. पंचवार्षिक योजना असो, महामार्गांची किंवा धरणांची निर्मिती असो, जनतेची विकास कामे असो या सर्वांसाठी मदत करण्यात एल.आय.सी. सर्वात अग्रेसर रहात आली, असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी चोपडा शाखेतील विकासअधिकारी प्रकाश कासार आणि सुहास पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सोबतच विमा प्रतिनिधी प्रदिप बारी, महेंद्र सोनवणे, भिका धनगर, एच. बी. मोतीराळे, दिलीप पाटील, सुकलाल पाटील, सरोजनी पाटील, कैलास देवकर, योगेश भाट या विमाप्रतिनिधींचाही विशेष कार्याबद्दल ट्रॉफी देवून शाखाधिकारी एस.एन.धोपेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धोपेकर यांनी एल.आय.सीत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर.बी. वाघजाळेसर, सेवानिवृत्त विकास अधिकारी गणेश पी. रावतोळे आणि चोपडा शाखेचे शाखाधिकारी एस.एन.धोपेकर यांची विशेष उपस्थितीत होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता अजनाडकर यांनी व आभार प्रदर्शन प्रकाश कासार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.के.भगत, राजेंद्र नेवे व त्याच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले आहे.