घरकूल घोटाळ्याचा निकाल हा न्यायदेवतेवर विश्वास दृढ करणारा तर आहेच. पण ‘आपण बांधू तेच तोरण आणि ठरवू तेच धोरण’ हा हेकेखोरपणा करणार्या दादागिरीला हादरा देणारा; त्या पुढार्याच्या कथित सर्वशक्तीमानपणाला भुलून आंधळा विश्वास टाकणार्या समर्थकांना राजकीय आयुष्यातून उठविणारा आणि यातून वाचण्यासाठी सोयिस्करपणे कोलांटउड्या मारणार्यांची फजिती करणारादेखील आहे. या निकालावर नेत्यांनीच नव्हे तर त्यांच्यापेक्षाही दुसर्या फळीतल्या त्यांच्या चेल्यांनी चिंतन करण्याची गरज आहे. कोर्टाचा हा निकाल ”येथेच करा आणि येथेच भरा” या निसर्गनियमाची पुन्हा एकचा प्रचिती करवून देणारा आहे. मात्र घरकूलचे आरोपी आज जात्यात असले तरी डोळे मिटून दुध पिणार्या मांजरीप्रमाणे खा-खा खाणारे दुसरे नेते व त्यांचे समर्थक हे सुपात असल्याची बाबदेखील नाकारता येत नाही. यामुळे अनेकांना घरकूलच्या निकालाने आनंदाच्या उकळ्या फुटल्या तरी त्याला उघडपणे व्यक्त करता येत नसल्याचे आजचे चित्र आहे. हा ‘सन्नाटा’ भ्रष्टाचाराच्या विळख्यात असणार्या जिल्ह्यातील राजकीय स्थितीचे विदारक स्वरूप दर्शविणारा आहे.
जळगावच्या राजकीय इतिहासात घरकूल गैरव्यवहार प्रकरण हे एक विभाजन रेषा ठरणार आहे. या आधीदेखील जिल्ह्यातील अनेक नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप झालेत. यातून अनेकांना पदेदेखील गमवावी लागली. काहींची प्रकरणे न्यायालयातदेखील पोहचली. मात्र एकाच फटक्यात ५० पेक्षा जास्त हाय-प्रोफाईल मंडळीला दणका देण्याचे काम फक्त आणि फक्त घरकूलनेच केल्याची बाब विसरता येणार नाही. या अर्थाने जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात ‘घरकूलपुर्व’ आणि ‘घरकूलपश्चात’ अशी गणना होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या निकालाला पुढे आव्हान देण्यात येऊन काय होईल ते होवो; पण प्रामाणिक अधिकार्यांनी ठरविले आणि सच्च्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला तर संबंधीत भ्रष्टाचारी हा कितीही ‘सेटींग एक्सपर्ट’ असला तरी त्याला दणका बसतोच हेदेखील या निकालाने स्पष्ट केले आहे.
घरकूलच्या निकालाच्या माध्यमातून जिल्हा राजकारणातील कट्टर दुश्मनीच्या एका अध्यायाची सांगता झाल्याचेही दिसून येत आहे. या खटल्यासाठी दिवंगत नरेंद्रअण्णा पाटील, उल्हास साबळे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. याला इमानदार अधिकार्याची साथ मिळाली. मात्र या सर्वांसोबत सुरेशदादा जैन यांचे विरोधक एकनाथराव खडसे यांनी केलेली मदतदेखील निर्णायक ठरली हे नाकारता येणार नाही. खडसे आणि जैन वादाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. तर या दोन्ही मान्यवरांच्या वैयक्तीक आयुष्यातही मोठी हानी झाली. हे वर्तुळ आणि घरकूलच्या निकालातून पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे साहजीकच एकनाथराव खडसे यांनी या प्रकरणी सर्वात पहिल्यांदा आणि विस्तृत अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी घरकूलच्या निकालावर सोयिस्कर मौन बाळगल्याचेही दिसून आले आहे.
जळगाव ग्रामीणमधून राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा मार्ग देवकरांच्या शिक्षेमुळे मोकळा झाला असला तरी सुरेशदादा जैन आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या समावेशामुळे त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आदी प्रमुख राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकार्यांनी शांत राहणेच पसंत केले आहे. कारण शिक्षा झालेल्यांचे सर्वपक्षीय हितसंबंध असल्यामुळे कुणी यावर प्रतिक्रिया देण्याची रिस्क घेतली नाही. खरं तर, पालकमंत्र्यांसह सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी तरी या प्रकरणी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. मात्र असे झाले नाही. याचमुळे शोलेमधील अजरामर झालेल्या डॉयलॉगचा आधार घेऊन ”जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात इतना सन्नाटा क्यू है भाई ?” असे विचारावेसे वाटते. मात्र याचे उत्तर मिळणार नसल्याचेही स्पष्ट आहे. कारण नेहमी अगदी साध्या-सुध्या मुद्यांवरून बडबड करणार्या आपल्या नेत्यांना घरकूलच्या निकालाने जणू काही तोंडात मिठाच्या पाण्याची गुळणी घ्यावी लागली आहे. या सोयिस्कर मौनाची इतिहास दखल घेणार असल्याचे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. कारण जनतेला सगळे माहिती आहेच. आपली नेतेगिरी ही न्यायालयासमोर फोल ठरणारी असल्याचा स्पष्ट संदेश या निकालाने दिला आहे. यामुळे घरकूलच्या निकालाने सुरेशदादा आणि त्यांच्या समर्थकांना हादरा दिला असला तरी याच मार्गावर असणारे नेते आणि त्यांच्या चेल्यांनाही अस्वस्थ केले आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश राजकारण्यांची ‘तेरी भी चूप…मेरी भी चूप’ अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे. तूर्तास इतकेच !