जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी जाहिरातींचे पोस्टर लावून शहराचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी महानगरपालिकेने कारवाई केली आहे. फुले मार्केटसमोरील रस्त्यावरील डिव्हायडरवर ‘सुपरस्टार सर्कस’चे अनधिकृत पोस्टर लावल्याचे आढळून आल्याने सर्कसच्या अज्ञात मालकाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण अधिनियम १९९५ च्या कलम ३ व ७ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या जाहिरात परवाना नियंत्रण विभागातील लिपिक चेतन पितांबर ठाकरे (वय ३३, रा. दिनकर नगर, जळगाव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ते कार्यालयात कर्तव्यावर असताना मनपाचे उपायुक्त पंकज गोसावी यांनी शहरातील अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार शहरात पाहणी आणि सर्वेक्षण करण्याची जबाबदारी संबंधित विभागाकडून पार पाडली जात होती.

या पाहणीदरम्यान सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी चेतन ठाकरे हे फुले मार्केट परिसरात पोहोचले असता, फुले मार्केटसमोरील रस्त्यावरील डिव्हायडरवर ‘सुपरस्टार सर्कस’ नावाचे कागदी पोस्टर लावलेले आढळून आले. सुमारे १ बाय १.५ फूट आकाराचे हे पोस्टर महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सार्वजनिक ठिकाणी जाहिरात पोस्टर लावण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक असताना संबंधित सर्कस मालकाने ती घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विनापरवानगी पोस्टर लावून शहराचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित पोस्टर व बॅनरचा पंचनामा करण्यात आला. तसेच घटनास्थळाचे जीपीएस छायाचित्र आणि पोस्टरची छायांकित प्रत पुरावा म्हणून जोडण्यात आली. त्यानंतर चेतन ठाकरे यांनी सर्कसच्या अज्ञात मालकाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाहिराती लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण अधिनियम १९९५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जळगाव शहर पोलिसांकडून सुरू आहे.



