यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त प्रवाशांनी लालपरीला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावल एसटी बस आगाराने उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन दिवसांत तब्बल ५२ लाख ४० हजार ८५० रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवत यावल आगाराने जळगाव विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा आगाराला मिळालेल्या २५ नवीन एसटी बसेस, नियोजनबद्ध जादा वाहतूक आणि चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या, पाडवा आणि भाऊबीज या सणांच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या तसेच नातेवाइकांच्या भेटीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी एसटी बसस्थानकांवर दिसून आली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावल एसटी आगाराने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले होते. प्रवाशांनीही खासगी वाहनांऐवजी सुरक्षित आणि विश्वासार्ह लालपरीला पसंती दिल्याने आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. यावल आगाराने या तीन दिवसांत एकूण ७८ हजार २१९ किलोमीटरचा प्रवास केला. या वाहतुकीतून ५२ लाख ४० हजार ८५० रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, विनासवलत प्रवासातून २८ लाख १५ हजार १७८ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर विविध सवलतींचा लाभ घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह एकूण उत्पन्नाने ५२ लाख ४० हजार ८५० रुपयांचा टप्पा गाठला. एका दिवसात १७ लाख ५८ हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविण्याची कामगिरीही आगाराने नोंदवली आहे.

१० नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी यावल आगाराच्या बसगाड्यांनी २५ हजार ५८६ किलोमीटरचा प्रवास केला. या एका दिवसात ९ लाख १८ हजार ५०७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांची गर्दी कायम राहिली. या दिवशी २६ हजार १६३ किलोमीटरचा प्रवास करीत ९ लाख २० हजार ५९९ रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजीही प्रवाशांचा प्रतिसाद कायम राहिला. या दिवशी एसटी बसगाड्यांनी २६ हजार ७४० किलोमीटरचा प्रवास केला आणि ९ लाख ७६ हजार ७२ रुपयांचे उत्पन्न मिळविले. सरासरी ६७ रुपये उत्पन्न प्रतिकिलोमीटर या दराने आगाराने चांगली कामगिरी नोंदविल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा यावल आगाराला २५ नवीन एसटी बसेस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचे नियोजन करणे अधिक सोयीचे झाले. जादा वाहतुकीसाठी चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित सेवा देण्यावर आगाराने भर दिला. परिणामी, दिवाळीच्या हंगामात उत्पन्नाच्या बाबतीत यावल आगाराने विभागात अव्वल स्थान मिळविले.
या विक्रमी यशाचे श्रेय यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी लालपरीवर प्रेम आणि विश्वास ठेवणाऱ्या प्रवासी नागरिकांसह आगारातील चालक, वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे. प्रवाशांनी दिलेला प्रतिसाद आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जळगाव विभागाचे राज्य परिवहन महामंडळाचे नियंत्रक बोरसे यांनी यावल आगाराच्या या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्यासह सर्व चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.



