नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या डिजिटल युगात मोबाईल, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या वेगामुळे पारंपरिक पत्रलेखनाची कला हळूहळू लोप पावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला पत्रसंस्कृतीचे महत्त्व कळावे आणि तिचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने नशिराबाद येथील प्रवक्ता अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष व उपक्रमशील ‘पोस्टकार्ड लेखन’ उपक्रम आयोजित करण्यात आला.
या अनोख्या उपक्रमात अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवत स्वतःच्या हाताने पोस्टकार्डवर सुंदर अक्षरात पत्रे लिहिली. पत्रलेखनानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्थानिक पोस्ट ऑफिसला प्रत्यक्ष भेट दिली आणि स्वतःच्या हाताने ही पत्रे लेटर बॉक्समध्ये पोस्ट केली. या भेटीदरम्यान टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसचे रोजचे कामकाज, पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे पोहोचते त्याची संपूर्ण प्रक्रिया आणि टपाल सेवेचे ऐतिहासिक महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.

मोबाईलच्या एका क्लिकवर काही सेकंदात संदेश पाठवण्याच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांनी अनुभवलेला हा पत्रलेखनाचा आगळावेगळा आणि प्रत्यक्ष अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरला. या उपक्रमामुळे जुन्या काळातील पत्रसंस्कृतीच्या अनमोल आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.



