Home उद्योग घरगुती दिवाळी फराळ आता थेट परदेशात पाठवता येणार! डाक विभागाची विशेष सुविधा...

घरगुती दिवाळी फराळ आता थेट परदेशात पाठवता येणार! डाक विभागाची विशेष सुविधा ; भुसावळ विभागातील २४० डाकघरांत सोय

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।दिवाळी म्हटली की घरगुती फराळाची गोडी, लाडू, चिवडा, चकली आणि करंजीचा सुगंध डोळ्यांसमोर येतो. मात्र, नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाइकांना घरच्या हाताने तयार केलेल्या फराळाची चव चाखता येत नाही. हीच उणीव दूर करण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता घरगुती दिवाळी फराळ थेट परदेशात पाठविणे शक्य होणार असून, यामुळे परदेशात राहणाऱ्या आप्तेष्टांनाही भारतीय दिवाळीचा गोडवा अनुभवता येणार आहे.

भारतीय डाक विभागाच्या या उपक्रमामुळे परदेशात राहणारे नातेवाईक, मित्रपरिवार आणि प्रियजनांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेता येणार आहे. अनेकजण कौटुंबिक, नोकरी किंवा व्यावसायिक कारणांमुळे दिवाळीला भारतात येऊ शकत नाहीत. अशा नागरिकांसाठी घरच्या हाताने बनवलेला फराळ आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्याची ही चांगली संधी ठरणार आहे. या सुविधेंतर्गत २५ किलोपर्यंतचा दिवाळी फराळ कॅनडा, संयुक्त अरब अमिराती (UAE), युनायटेड किंगडम (UK), सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, आयर्लंड यांसह एकूण १२० देशांमध्ये पाठविता येणार आहे. पार्सलचे शुल्क त्याचे वजन, पॅकिंग आणि निवडलेल्या वाहतुकीच्या प्रकारानुसार निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार फराळ परदेशात पाठविता येईल.

भुसावळ डाक विभागातील मुख्य डाकघरासह सर्व ३२ उपडाकघरांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना पार्सल पाठविण्यासाठी डाकघरात जाण्याची आवश्यकता नसून, पोस्टमनमार्फत घरूनच पार्सल स्वीकारण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. याशिवाय भुसावळ मुख्य डाकघरात नाममात्र शुल्कात दर्जेदार पार्सल बॉक्स पॅकिंगची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे फराळाचे योग्य पॅकिंग करून तो सुरक्षितपणे परदेशात पाठविणे शक्य होणार आहे. दरम्यान, देशांतर्गत पार्सल आणि स्पीड पोस्ट पाठविण्याची सुविधाही भुसावळ विभागातील २०८ शाखा डाकघरांसह सर्वत्र उपलब्ध आहे. भारतीय डाक विभागाच्या या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरगुती दिवाळी फराळाची गोडी अनुभवता येणार असून, सातासमुद्रापारही नात्यांमधील आपुलकीचा गोडवा पोहोचणार आहे.


Protected Content

Play sound