Home Cities भुसावळ निधीसाठी वरणगावच्या नगराध्यक्षांची अनोखी सायकलवारी ! ६० किमी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांना देणार...

निधीसाठी वरणगावच्या नगराध्यक्षांची अनोखी सायकलवारी ! ६० किमी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

0
3

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषदेला विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. निधीची मागणी करण्यासाठी नगराध्यक्ष काळे हे कार्यकर्त्यांसह वरणगाव ते जळगाव अशी तब्बल ६० किलोमीटरची सायकलवारी करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांच्या या सायकलवारीची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेची निवडणूक होऊन जवळपास एक वर्ष होत आले आहे. मात्र, नगरपरिषदेला अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याने शहरातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या खात्यात सध्या एक रुपयाही शिल्लक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शहरातील नागरिकांच्या विकासकामांबाबत अपेक्षा वाढत असताना निधीअभावी कामे करणे शक्य होत नसल्याची खंत नगराध्यक्षांनी व्यक्त केली. रस्ते, नागरी सुविधा आणि इतर विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असताना आर्थिक तरतूदच नसल्याने नगरपरिषदेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुनील काळे यांनी सायकलवरून जळगाव गाठण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांसह वरणगाव येथून सायकलवारीला सुरुवात करून ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. सुमारे ६० किलोमीटरचा हा प्रवास करून नगरपरिषदेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ते करणार आहेत.


Protected Content

Play sound