Home आरोग्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वासुदेव नेत्रालयाचा माणुसकीचा हात ; महिनाभर मोफत नेत्र तपासणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वासुदेव नेत्रालयाचा माणुसकीचा हात ; महिनाभर मोफत नेत्र तपासणी

0
15

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी वरणगाव येथील ‘वासुदेव नेत्रालया’ने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि वाढत्या खर्चामुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवतानाही अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत डोळ्यांच्या आजारांवरील तपासणी आणि उपचारांकडे पैशांअभावी दुर्लक्ष केले जाते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन वासुदेव नेत्रालयाच्या संचालिका डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नी. तु. पाटील यांनी मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान केवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. नी. तु. पाटील आणि डॉ. रेणुका पाटील यांनी केले आहे.

वासुदेव नेत्रालयाने यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांसाठी विशेष सवलती, प्रिस्क्रिप्शनवर समाजप्रबोधनपर संदेश आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेत्रालयाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी महिनाभर मोफत नेत्र तपासणीचा उपक्रम राबवून सामाजिक कार्याचा आणखी एक आदर्श निर्माण केला आहे. “ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या समाजामुळे आपल्याला नाव आणि ऐश्वर्य मिळाले, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच भावनेतून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. निसर्गाने पाठ फिरवली तरी आम्ही आमच्या परीने शेतकऱ्यांना साथ देऊ,” अशी भावना डॉ. रेणुका पाटील आणि डॉ. नी. तु. पाटील यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound