यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान निर्माण झालेल्या वादात पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून, सार्वजनिक रस्त्याचा वापर सर्व धर्मांच्या मिरवणुकांसाठी भेदभाव न करता खुला ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त २५ ऑक्टोबर २०२६ रोजी किनगाव येथे विजयादशमी उत्सवानिमित्त पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संचलनाबाबत ९ ऑक्टोबर रोजीच पोलीस प्रशासनाला लेखी पूर्वसूचना देण्यात आली होती. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संचलन आयोजित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, संचलनाच्या नियोजित मार्गावर काही व्यक्तींनी गावातील प्रमुख सार्वजनिक रस्ता अडवून मार्ग बदलण्याचा आग्रह धरल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी ७:३० वाजता सुरू होणारे संचलन तब्बल चार तास उशिराने म्हणजेच सकाळी ११:३० वाजता सुरू झाले. या काळात पोलीस प्रशासनाकडून वारंवार समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संबंधितांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याचे निवेदनात म्हटले आहे. किनगावमधील याच प्रमुख सार्वजनिक रस्त्यावरून हिंदू समाजाच्या अंत्ययात्रा, विवाह मिरवणुका, गणेशोत्सव आणि देवीच्या मिरवणुका काढताना वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे सकल हिंदू समाजाने निवेदनात नमूद केले आहे. दुसरीकडे, इतर समाजाच्या धार्मिक मिरवणुकांना हिंदूबहुल वस्तीतून जाण्यास विरोध केला जात नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्याच्या वापराबाबत असा दुहेरी निकष ठेवणे संविधानातील समानतेच्या तत्त्वाला धरून नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
भारतीय संविधान, सर्व धर्मांचा आदर आणि गावातील सामाजिक सलोखा यांवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्याला विरोध नसल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्याचा अधिकार सर्व समाजांना समानतेने मिळायला हवा. कोणत्याही एका समाजाच्या मर्जीवर सार्वजनिक रस्त्याचा वापर अवलंबून राहू शकत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून २५ ऑक्टोबर रोजी रस्ता अडविणाऱ्या आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच किनगावमधील संबंधित सार्वजनिक रस्ता सर्व धर्मांच्या धार्मिक मिरवणुकांसाठी भेदभावविरहित खुला ठेवण्याबाबत प्रशासनाने लेखी आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय हिंदू समाजाच्या अंत्ययात्रा, विवाह मिरवणुका, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकांना भविष्यात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची हमी द्यावी. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने लेखी निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



