Home Cities जळगाव ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणीचे माजी केंद्र निदेशक, ज्येष्ठ कवी व साहित्यिक भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहासह ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जळगावातील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वयाच्या ९० व्या वर्षीही साहित्यनिर्मितीचा उत्साह कायम राखत त्यांनी दोन नवे काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आणले. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या साहित्यप्रवासाचा गौरव करत त्यांच्या कवितेतील मानवता, सामाजिक जाणीव, विद्रोही विचार आणि संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले.
‘कवितेच्या वळणवाटा’ या मराठी काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी वा. ना. आंधळे यांच्या हस्ते, तर ‘तुकबंदी’ या हिंदी-उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व समीक्षक डॉ. रफिक काझी ‘राही’ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळजी जेठा महाविद्यालयातील प्रा. देवेंद्र इंगळे होते. अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सुधीर भटकर यांनी भगवान भटकर यांच्या प्रदीर्घ साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. आकाशवाणीतील दीर्घ सेवाकाळात प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांच्यातील कवी सतत जागृत राहिला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचा ‘मागे राहिलेल्या कविता’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर वयाच्या ९० व्या वर्षी दोन नवे काव्यसंग्रह रसिकांसमोर आणणे ही साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
भगवान भटकर यांच्या साहित्यनिर्मितीला पुस्तकांचे स्वरूप देण्याची जबाबदारी अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी यांनी समर्थपणे पार पाडली. तसेच कवी वा. ना. आंधळे आणि डॉ. रफिक काझी यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून दोन्ही काव्यसंग्रहांची साहित्यिक उंची वाढविली. या योगदानाबद्दल डॉ. सुधीर भटकर यांनी संबंधितांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
मनोगत व्यक्त करताना डॉ. रफिक काझी ‘राही’ म्हणाले की, साहित्यलेखन माणसाला चिरतरुण ठेवते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे भगवान भटकर होत. त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि उत्साही जीवनाचे रहस्य त्यांच्या साहित्यप्रेमात दडलेले आहे. त्यांच्या कवितेत मानवताधर्माचा संदेश, संवेदनशीलता आणि मानवी भावभावनांची सखोल जाणीव प्रकर्षाने दिसून येते. त्यांच्या लेखणीतून माणुसकी आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रसिद्ध कवी वा. ना. आंधळे यांनी भगवान भटकर यांच्या कवितेतील वैशिष्ट्ये अधोरेखित करताना त्यांच्या साहित्यात दलित आणि ललित साहित्याचा सुंदर संगम असल्याचे सांगितले. उद्विग्नता, सामाजिक जाणीव, जागृती, चिकित्सा, दुःख, आनंद, प्रेम, जीवनमूल्ये आणि सामाजिक अभिसरण अशा विविध साहित्यिक मूल्यांचा आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतो.
चारोळी, अभंग, हायकू, लावणी, ओवी अशा विविध काव्यप्रकारांचा प्रसंगानुरूप सुंदर मिलाफ त्यांनी साधला आहे. त्यांच्या कवितेत वेदना, विद्रोह आणि परिवर्तनाची हाक प्रभावीपणे उमटते. समाजातील समस्यांवर भाष्य करण्यासोबतच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या कवितेवर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पीएच.डी. स्तरावर संशोधन होऊ शकते, असे मतही आंधळे यांनी व्यक्त केले. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. देवेंद्र इंगळे यांनी भगवान भटकर यांचा गौरव करताना त्यांची ‘महाराष्ट्राचे अमीन सयानी’ अशी ओळख असल्याचे नमूद केले. त्यांच्या कवितेत विद्रोह, विज्ञाननिष्ठ विचार आणि वैश्विक मानवतेचा सुंदर आविष्कार दिसून येतो. कवीचे मन झिरपणे आणि पाझरणे म्हणजे काय, याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. शालीनता, मृदुता आणि संवेदनशीलतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांची कविता होय. त्यांच्या कवितांना संगीतबद्ध करून उत्तम गीतांची निर्मिती होऊ शकते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांनी आपल्या मनोगतात आकाशवाणीची सेवा बजावताना कविता लेखनाचा छंद जोपासल्याचे सांगितले. मात्र, प्रशासकीय कामांच्या व्यापामुळे मनातील अनेक भावभावना आणि विचारांना शब्दरूप देणे शक्य झाले नाही. आता पूर्वीचा एक आणि नव्याने प्रकाशित झालेले दोन अशा तीन काव्यसंग्रहांच्या माध्यमातून मनातील विचार आणि भावविश्व व्यक्त करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. वा. ना. आंधळे आणि डॉ. रफिक काझी यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण समीक्षात्मक प्रस्तावनांमुळे काव्यसंग्रहांची साहित्यिक उंची वाढली असून, ही बाब आयुष्यभर आनंद देत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. देवेंद्र इंगळे यांचे स्वागत उपकुलसचिव डॉ. मुनाफ शेख यांनी केले. कवी वा. ना. आंधळे यांचे स्वागत वैद्य पी. एस. चौधरी, डॉ. रफिक काझी यांचे स्वागत होमिओपॅथी कन्सल्टंट डॉ. विलास महाजन, युवराज माळी यांचे स्वागत डॉ. सुभाष तळेले, तर कवी भगवान भटकर यांचे स्वागत प्रा. चारुदत्त गोखले यांनी केले. सौ. यशोदा भटकर यांचे स्वागत सौ. प्रज्ञा इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले, तर गौरव हरताळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. सोमनाथ वडनेरे, कवी संतोष साळवे, डी. डी. पाटील (जामनेर), बाळकृष्ण तायडे (बुलढाणा), कवी शीतल पाटील, पुष्पा कोळी, वंदना ठुमके, एन. के. कोळी, निंबा पुना बडगुजर, गोविंद पाटील, शिवलाल बारी, सेवानिवृत्त प्रांताधिकारी प्रीतम तायडे, महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष मराठे, गोविंद सावदेकर, राहुल झांबरे, किशोर भारंबे, गोपाल चव्हाण, अतुल पाटील, यशवंत गरुड, अनिल मस्के, प्रल्हाद लोहार, मंगेश बाविसाने यांच्यासह जळगाव शहर व जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वयाच्या नव्वदाव्या वर्षीही साहित्यनिर्मितीची उमेद आणि कवितेची ओढ कायम राखणाऱ्या भगवान भटकर यांनी दोन नव्या काव्यसंग्रहांच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि उर्दू साहित्यविश्वात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या साहित्यप्रवासाचा गौरव करणारा हा प्रकाशन सोहळा जळगावच्या साहित्यिक क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरला.

Protected Content

Play sound