Home Cities अमळनेर साक्ष दिल्याचा राग! अमळनेर तालुक्यात वाळूमाफियांचा थरार ; डंपरखाली चिरडून प्रौढाची हत्या

साक्ष दिल्याचा राग! अमळनेर तालुक्यात वाळूमाफियांचा थरार ; डंपरखाली चिरडून प्रौढाची हत्या

0
11

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाळू तस्करीच्या गुन्ह्यात शासकीय पंच म्हणून साक्ष दिल्याचा राग मनात धरून ५२ वर्षीय प्रौढाला वाळूने भरलेल्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील नांद्री येथे घडली. शनिवारी (१ नोव्हेंबर) रात्री सुमारे पावणेदहा वाजता गावातील बसस्थानकासमोर हा प्रकार घडला. शरद रतन पाटील (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे नांद्री परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पाटील हे यापूर्वी गावात वाळू वाहतुकीवरून झालेल्या मारहाणीच्या एका गुन्ह्यात शासकीय पंच म्हणून साक्षीदार होते. त्यांनी या प्रकरणात साक्ष दिल्याचा राग संबंधित आरोपींच्या मनात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परिसरातील अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्यावरूनही त्यांचा काही व्यक्तींशी जुना वाद असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, घटनेच्या अवघ्या तीन दिवस आधी शरद पाटील यांना आरोपींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास शरद पाटील नांद्री गावातील बसस्थानकासमोर उभे असताना आरोपींनी वाळूने भरलेला डंपर त्यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. डंपरखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नसून जुन्या वादातून जाणीवपूर्वक घडवून आणलेली हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी विपुल गोसावी, मयूर गोसावी, सागर गोसावी आणि भरत सुभाष पाटील या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, डंपरचालक भरत सुभाष पाटील याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, या हत्येमागील नेमके कारण आणि सर्व संबंधितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार दाखल असतानाही शरद पाटील यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध वाळू वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि गुन्ह्यात साक्ष देणाऱ्या व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याच्या घटनेने वाळूमाफियांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound