जळगाव- धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी दोघांना धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चावलखेडा येथील रेल्वे बोगद्याजवळ धरणगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही धडाकेबाज कारवाई केली. शंकर जासक आणि गजानन पवार अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून दोन ते तीन बॅगा जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत चार दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी शस्त्राचा, विशेषतः पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील रोकड लुटली आणि घटनास्थळावरून पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. यावेळी एका दरोडेखोराला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, दरोडेखोर धरणगावच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पथकासह चावलखेड्याच्या दिशेने धाव घेतली. दरोडेखोरांचा संभाव्य मार्ग लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी चावलखेडा येथील रेल्वे बोगद्याजवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापळा रचून दोघांना पकडले.
पकडण्यात आलेल्या शंकर जासक आणि गजानन पवार यांच्याकडून दोन ते तीन बॅगा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या बॅगांमध्ये दरोड्याशी संबंधित साहित्य किंवा मुद्देमाल आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील रोकड लुटण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने दरोडेखोरांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. धरणगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने केलेल्या या कारवाईमुळे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही दरोडेखोरांकडून बॅगा जप्त केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.



