Home प्रशासन बोनसचा तिढा सुटला, कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले; मुख्य अभियंत्यांच्या पुढाकाराने दिवाळी गोड!

बोनसचा तिढा सुटला, कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले; मुख्य अभियंत्यांच्या पुढाकाराने दिवाळी गोड!

0
4

दीपनगर : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित दिवाळी बोनसचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या सकारात्मक पुढाकारामुळे प्रशासन, कंत्राटदार आणि कामगार संघटनांमध्ये समन्वय घडून आला असून, २८ व २९ ऑक्टोबरपासून कामगारांना दिवाळी बोनसचे वाटप सुरू झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर बोनस मिळण्यास सुरुवात झाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांच्या उपस्थितीत कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत २९ ऑक्टोबरपर्यंत कामगारांना बोनस देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कंत्राटदार असोसिएशन आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्रिपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोनस वाटपाबाबत सकारात्मक चर्चा होऊन प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला.

विशेष म्हणजे, कंत्राटदारांची प्रलंबित वेतन बिले मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे कंत्राटदारांनाही कामगारांना बोनस अदा करणे शक्य झाले. नियमित कामांसोबतच आयटम बेस काम करणाऱ्या कंत्राटदारांनीदेखील कामगारांना बोनस देण्याची तयारी दर्शविली असून, प्रत्यक्ष बोनस वाटप सुरू केले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. तसेच उपमुख्य अभियंता उमरे, पाधाळे, वैशाली पाटील, कार्यकारी अभियंता अतुल पवार, मोहन ठाकरे आणि कामगार कल्याण अधिकारी प्रीती रामटेके यांनीही सकारात्मक भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

बैठकीस महाराष्ट्र कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष राजू साबळे, सचिव मिलिंद धर्माधिकारी, उपाध्यक्ष उन्मेष पाटील, धर्मेश पटेल, भूषण पाटील, दत्तू साबळे, संतोष सोनवणे आणि दीपक भिरुड उपस्थित होते.

याशिवाय महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) भुसावळचे सचिन भावसार, रोजंदारी मजदूर सेनेचे कैलास नेमाडे, महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कंत्राटी कामगार संघटना (CITU) चे कमलेश राणे, भीम आर्मी आझाद कामगार एकता युनियनचे शकील शेख आणि महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटना (ILU) चे विजय मालवीय यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.


Protected Content

Play sound