Home क्राईम मानेगावात महावितरणची धडक कारवाई; ५० ते ६० घरांतील वीज चोरीचे आकडे हटविले,...

मानेगावात महावितरणची धडक कारवाई; ५० ते ६० घरांतील वीज चोरीचे आकडे हटविले, हजारोंचे साहित्य जप्त!

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील मानेगाव येथे महावितरणच्या पथकाने वीज चोरीविरोधात धडक मोहीम राबवत तब्बल ५० ते ६० घरांमधील अनधिकृत वीज जोडण्या हटविल्या. थेट वीजवाहिनीवर आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत वीज चोरीसाठी वापरण्यात येणारे हजारो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. महावितरणच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मानेगाव परिसरात अनेक घरांमध्ये अधिकृत वीज जोडणी न घेता थेट वीजवाहिनीवर आकडे टाकून वीज वापरली जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान पथकाने गावातील विविध भागांची तपासणी करून अनधिकृत वीज जोडण्या शोधून काढल्या. त्यानंतर सुमारे ५० ते ६० घरांमधील वीज चोरीसाठी वापरण्यात येणारे आकडे आणि जोडण्या काढून टाकण्यात आल्या. तसेच वीज चोरीसाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले.

वीज चोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकांवरही त्याचा परिणाम होतो. याशिवाय अनधिकृत जोडण्यांमुळे विद्युत अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे. या मोहिमेनंतर पुन्हा कोणी अनधिकृत पद्धतीने वीज वापरताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

नागरिकांनी वीज चोरीचा मार्ग अवलंबण्याऐवजी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी. अनधिकृत जोडण्यांचा वापर टाळावा आणि विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या विशेष कारवाईत सहाय्यक अभियंता योगेश शेकोकार, सहाय्यक अभियंता अक्षय उमप, लाईनमन अनिल मिस्तरी, वरिष्ठ तंत्रज्ञ धनराज राठोड, महेश चौधरी, छाया राणे, सचिन इंगळे, जितेंद्र पाटील, स्वप्नील तायडे, पंकज राणे, दीपक इंगळे, मैथिली नंदेश्वर, भावेश पाटील आणि तुषार पाटील यांनी सहभाग घेतला.


Protected Content

Play sound