Home क्राईम रावेरमध्ये गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात ! तिघांना अटक

रावेरमध्ये गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात ! तिघांना अटक

0
19

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथून गोठ्यात बांधलेली गाय चोरीला गेल्याच्या घटनेचा रावेर पोलिसांनी छडा लावला आहे. रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरे चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. संशयितांनी गाय चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या कारवाईमुळे परिसरातील पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.

शिंदखेडा येथील संतोष देविदास पाटील (वय ४२) हे शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्या घराशेजारील गोठ्यात दोन गायी आणि तीन म्हशी बांधलेल्या होत्या. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास गोठ्यातून जनावरांचा आवाज आल्याने संतोष पाटील हे काय झाले, हे पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोठ्यातील तपकिरी रंगाची, मोठी शिंगे असलेली आणि दावणीला बांधलेली गाय गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाय परिसरात शोधूनही मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने गोठ्यातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकाने चोरीच्या घटनेशी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांची माहिती मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना संशयितांची ओळख पटविण्यात यश आले. या तपासातून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शेख मुस्ताक शेख इसाक (वय ३८, रा. कुरेशी मोहल्ला, रसलपूर, सध्या रा. मदिना कॉलनी, रावेर), शेख अक्रम शेख असलम (वय २५, रा. जुनी नगरपालिका समोर, इमामवाडा, रावेर) आणि शेख समीर शेख कलीम (वय २६, रा. मदिना कॉलनी, रावेर) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या चौकशीत संबंधित गाय चोरी करून नेल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर तिन्ही आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या जनावराच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून, या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत. ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकारोद्दीन शेख आणि योगेश पाटील यांनी तपास व कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound