Home प्रशासन भुसावळमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक उमेदवारांचा सहभाग

भुसावळमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक उमेदवारांचा सहभाग

0
भुसावळमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ६०० हून अधिक उमेदवारांचा सहभाग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भुसावळ येथील रेल्वे ग्राउंडवर पार पडलेल्या या शिबिरात ६०० हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदविला. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, शारीरिक चाचणीची प्रात्यक्षिके, लेखी परीक्षेची तयारी आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन मिळाल्याने उमेदवारांना पोलीस भरतीसाठी तयारीची योग्य दिशा मिळाली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय वामन सावकारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नियोजनातून हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. भुसावळ उपविभागासह परिसरातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या शिबिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली. केवळ भरती प्रक्रियेची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता उमेदवारांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शारीरिक चाचणीचे निकष समजावून सांगण्यात आले. त्यामुळे भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी असलेल्या शंकांचे निरसन करण्याची संधी तरुणांना मिळाली. पोलीस भरतीमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या उंची आणि छाती मोजमापाबाबत विशेष प्रात्यक्षिक घेण्यात आले. अधिकृत भरती निकषांनुसार उमेदवारांची उंची कशा पद्धतीने मोजली जाते, तसेच छातीचे मोजमाप सामान्य स्थितीत आणि छाती फुगवून कसे घेतले जाते, याची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या प्रक्रियेतील नियम आणि मोजमापाचे निकष समजावून सांगत उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

मैदानी चाचणीतील गोळाफेक या प्रकारावरही विशेष मार्गदर्शन करण्यात आले. गोळा पकडण्याची योग्य पद्धत, फेक करताना शरीराचा समतोल राखणे, शरीराच्या हालचालींमध्ये योग्य समन्वय ठेवणे आणि फाऊल होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. केवळ ताकदीच्या जोरावर नव्हे, तर योग्य तंत्र आणि नियमित सरावाच्या माध्यमातून मैदानी चाचणीत चांगली कामगिरी करता येते, हे उमेदवारांना समजावून सांगण्यात आले. पोलीस भरती प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता हा महत्त्वाचा टप्पा असल्याने याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. अर्ज भरताना किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी उमेदवारांनी आधीपासूनच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण या विषयांवर भर देण्यात आला. अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि नियमित प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव यांचे महत्त्व उमेदवारांना पटवून देण्यात आले. लेखी परीक्षेबरोबरच मैदानी चाचणीची तयारीही तितकीच आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नियमित व्यायाम, धावण्याचा सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि योग्य प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले. ‘आजची तयारी… उद्याचा पोलीस अधिकारी!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरामुळे पोलीस भरतीची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींना भरती प्रक्रियेचे प्रत्यक्ष स्वरूप समजून घेता आले. विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांना तज्ज्ञ मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तयारीतील महत्त्वाचे पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली.