Home Cities जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात उद्या ‘युवरंग २०२६’चा जल्लोष ! युवक महोत्सव व...

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात उद्या ‘युवरंग २०२६’चा जल्लोष ! युवक महोत्सव व दिव्यांग कला महोत्सवाचा समारोप ; हास्यजत्रा फेम हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

0
25

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘युवरंग २०२६’ तसेच दिव्यांग कला महोत्सवाच्या समारोपाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिराव फुले सभागृहात (दीक्षांत सभागृह) समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध सिने-नाट्यकलावंत आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. विजय ल. माहेश्वरी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सिने-नाट्यकलावंत हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थी आणि कलाप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. सोपान तु. इंगळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून, महाराष्ट्र शासन नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य तथा युवरंग-२०२६ चे समन्वयक  राजेंद्र नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवक महोत्सवाचे आयोजन केले जाते. अशा महोत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला, संस्कृती, साहित्य, सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रांत आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळते. आंतरमहाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासोबतच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होते. यंदाच्या युवरंग महोत्सवासोबत दिव्यांग कला महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे, या दृष्टीने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यंदाचे वर्ष विद्यापीठात ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर युवक महोत्सव आणि दिव्यांग कला महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक समावेशकता, समान संधी आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश अधोरेखित होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सन्मान करताना समाजातील सर्व घटकांना समान व्यासपीठ मिळावे, ही या उपक्रमामागील महत्त्वाची भूमिका आहे. समारोप समारंभात महोत्सवातील विविध कला प्रकारांमध्ये सहभागी झालेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थी, विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमोल पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रविण महाले आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह समस्त आयोजन समितीने निमंत्रण दिले आहे.


Protected Content

Play sound