धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत हस्तगत केली आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील एका अट्टल चोरट्याला कजगाव (ता. भडगाव) येथून ताब्यात घेण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास त्यांनी आपली काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटारसायकल (क्रमांक MH-19-DL-0268) धरणगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर पार्क केली होती. पंचायत समिती येथे कामानिमित्त जाऊन सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास परत आले असता, त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३६७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्त्याखालील अधिकारी व अंमलदारांचे तपास पथक रवाना केले.
तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी मनोज केदार बारेला (रा. हुगाने, ता. सेंधवा, जि. बडवाणी, राज्य मध्य प्रदेश) याला कजगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथून ताब्यात घेतले. आरोपीकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली २५,०००/- रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, पोलीस अंमलदार विष्णु बिऱ्हाडे, दीपक माळी, हरिलाल पाटील, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, राहुल कोळी, महेश सोमवंशी, गोपाळ पाटील तसेच तपासी अंमलदार पोलीस अंमलदार जितेंन्द्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
धरणगाव येथून चोरीला गेलेली २५ हजार रुपयांची मोटारसायकल जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढली असून मध्य प्रदेशातील आरोपीला कजगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत.



