


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात पाच दिवसांच्या लाडक्या गणपती बाप्पाला अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. या विसर्जन सोहळ्यात सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम पथकाच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश देण्यासाठी सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयात यंदा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला होता. विद्यालयात शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक श्रींची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच निसर्ग आणि पर्यावरणाविषयी आपुलकी व जबाबदारीची भावना रुजावी, तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शाळेतील चिमुकले विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत लेझीमच्या तालावर तालासुरात ठेका धरत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या जोशपूर्ण आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे विसर्जन मिरवणुकीला एक वेगळीच शोभा आणि आकर्षण प्राप्त झाले. यावेळी शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्या बाप्पाला भावूक अंतःकरणाने निरोप दिला. सौ. तु. ल. कोळंबे विद्यालयाचा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव, विद्यार्थ्यांचा लेझीम पथकातील उत्साही सहभाग आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हा उपक्रम संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरला आहे.



