Home Cities अमळनेर ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया’ ; मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया’ ; मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

0
7

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यंदा राज्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांची दिवाळीही आनंदात आणि गोड व्हावी, या सामाजिक जाणिवेतून अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेने ‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया… त्यांचे घरही आनंदाने प्रकाशमान करूया!’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या या भावनिक आवाहनाला आता नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला असून, धुळे जिल्ह्यातील एका सेवाभावी आई-मुलाने दिवाळी फराळ देऊन या उपक्रमाची सुरुवात केली.

धुळे जिल्ह्यातील काळखेडे येथील मूळ रहिवासी आणि सध्या धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर डिजिटल मार्केटिंग ॲण्ड डिझायनिंगचा व्यवसाय करणारे लोटन शरद पाटील (कचवे) यांनी आपल्या मातोश्री मथुराबाई पाटील यांच्यासह स्वखर्चाने दिवाळी फराळ खरेदी करून मंगळग्रह सेवा संस्थेकडे सुपूर्द केला. संस्थेचे गरजवंतांसाठीचे आवाहन वाचताच त्यांनी कोणताही विलंब न करता मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.

मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी लोटन पाटील यांच्या हाती अमळनेरसह जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत वितरित करण्यात आलेले संस्थेचे आवाहनपत्रक आले. ते वाचल्यानंतर त्यांनी तातडीने आपल्या मातोश्रींसमवेत श्री मंगळग्रह मंदिर गाठले आणि दिवाळी फराळ संस्थेच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केला. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आणि डी. ए. सोनवणे यांनी हा फराळ आदरपूर्वक स्वीकारला. यावेळी विश्वस्त मंडळाने लोटन पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी दाखवलेल्या सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या या दातृत्वाचा गौरव करत दोघांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या या आई-मुलाच्या कृतीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक होत आहे.

दरम्यान, मंगळग्रह सेवा संस्थेने गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी फराळ, नवीन कपडे किंवा सुस्थितीतील वापरण्यायोग्य कपडे, अन्नधान्य, किराणा तसेच इतर जीवनावश्यक वस्तू दान करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी या वस्तू श्री मंगळग्रह मंदिरात आणून द्याव्यात किंवा स्वतः गरजूंना वितरित कराव्यात, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आवाहनपत्रक अमळनेरसह जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत वितरित करण्यात आले आहे. त्यानंतर दिवसभर अनेक नागरिकांनी दूरध्वनीद्वारे संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेने सामाजिक जाणीवेतून गरजवंतांसाठी अशा प्रकारचे आवाहन करणे ही अभिनंदनीय आणि अनुकरणीय बाब असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तसेच दिवाळी फराळासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठीही तयारी दर्शवली.


Protected Content

Play sound