रावेर/सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उपक्रमशीलता, समर्पण आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या शिक्षकांमुळे शाळेसह संपूर्ण शिक्षण संस्थेचा नावलौकिक उंचावतो. शिक्षक सेवानिवृत्त झाले तरी त्यांचे ज्ञान, अनुभव आणि शैक्षणिक योगदान समाजासाठी कायम मार्गदर्शक ठरते. त्यामुळे खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या उपशिक्षिका भारती बढे यांनी सेवानिवृत्तीनंतरही कलाम सायंटिस्ट सेंटरच्या माध्यमातून आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवावे, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे संस्थाप्रमुख तथा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले.
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका भारती बढे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कुमारदादा चौधरी होते. यावेळी युवा नेते धनंजयभाऊ चौधरी, संस्थेचे सचिव अजितदादा पाटील, माजी सचिव प्रभात चौधरी, सहसचिव सुधाकर झोपे, संचालिका रोहिणीताई चौधरी, अशोक कोलते, भास्कर राणे, प्राचार्या लता मोरे, प्राचार्य वाय. व्ही. पाटील, अतुल महाजन, मुख्याध्यापक वाय. एल. पाटील, हर्षा नेमाडे, मुख्याध्यापिका मनिषा महाजन आणि पर्यवेक्षक एस. आर. किरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारती बढे यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत केवळ अध्यापनाचे कार्य न करता विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. आय.बी.टी., अटल टिंकरिंग लॅब आणि कलाम सायंटिस्ट सेंटरच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे शाळेच्या सुटीच्या दिवशीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वेळ दिला. त्यांच्या या योगदानामुळे विद्यालयाचा नावलौकिक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मोलाची मदत झाली. त्यांच्या निस्वार्थी, सेवाभावी आणि उपक्रमशील कार्याची दखल घेत कार्यक्रमात अध्यक्ष कुमारदादा चौधरी यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारती बढे व त्यांचे पती यांचा शाल, हार, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सहसचिव सुधाकर झोपे यांनी जनता शिक्षण मंडळ ही संस्था पूज्य मधुकरराव चौधरी यांच्या स्वप्नातून साकारलेली असल्याचे सांगितले. या संस्थेच्या माध्यमातून भारती बढे यांनी केलेली निस्वार्थी सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष कुमारदादा चौधरी यांनीही उपक्रमशील शिक्षक हे संस्थेचे खरे वैभव असून, सेवानिवृत्तीनंतरही शिक्षक समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करू शकतात, असे मत व्यक्त केले.
युवा नेते धनंजयभाऊ चौधरी यांनी भारती बढे यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मानपत्राचे वाचन मनिषा पाटील यांनी केले. विद्यार्थिनी मोक्षदा फालक, वैभवी जामोदकर तसेच उपशिक्षिका हेमलता चौधरी यांनी भारती बढे यांच्या कार्याचा गौरव करत आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना भारती बढे यांनी जनता शिक्षण मंडळ, विद्यालयाचे प्रशासन, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनता शिक्षण मंडळासारख्या शैक्षणिक संस्थेत सेवा करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा पाटील आणि प्रा. जगदीश ढोले यांनी केले, तर एस. पी. बाक्षे यांनी आभार मानले.



