


चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून चाळीसगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने अवैध गुटखा तस्करीवर मोठी धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले आयशर वाहन असा एकूण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या विशेष सूचनेनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. हिरापूर रोडवरील ठाकूरवाडी परिसरातील विनोद किराणा स्टोअर्समध्ये बंदी घातलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून नचिकेत सुनील येवले याला ताब्यात घेतले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका धडक कारवाईत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या पथकाने जुने बी. जे. मार्केट, जळगाव येथे सापळा रचला. यावेळी आयशर वाहनातून (MH-48-AY-1848) गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या मधुकर धोंडू इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनातून १ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा गुटखा आणि १५ लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अवैध गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हा साठा नेमका कुठून आणला गेला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.



