


रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त रावेर येथे रावेर, यावल, मुक्ताईनगर व फैजपूर इंजिनिअर असोसिएशन आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभियांत्रिकी दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला रावेर परिसरासह लगतच्या तालुक्यांतील स्थापत्य, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कार्यक्रम असोसिएशनचे अध्यक्ष आर. आर. पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर विभागनिहाय उपाध्यक्ष राजेश सोनवणे (रावेर विभाग), संदीप बागुल (मुक्ताईनगर विभाग) आणि शेख मोहसीन (फैजपूर विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्नेहसोहळ्यात अभियांत्रिकी क्षेत्राच्या माध्यमातून आधुनिक विकासाला मिळणारी गती, बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलते तंत्रज्ञान तसेच समृद्ध समाज निर्मितीत अभियंत्यांचे योगदान या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. उपस्थित अभियंत्यांनी परस्परांना अभियांत्रिकी दिनाच्या शुभेच्छा देत आपापल्या क्षेत्रातील अनुभव व तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण केली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अभियंते, अल्ट्राटेक सिमेंट टीम व संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानले.



