सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शिवसेनेचे सावदा शहरप्रमुख तथा नगरसेवक सूरज परदेशी यांनी नगरपालिका प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सावदा शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी हे कुत्रे नागरिकांचा पाठलाग करतात, दुचाकीस्वारांच्या वाहनांवर धावून जातात, तसेच लहान मुलांवर हल्ला करण्याच्या घटनांबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर सूरज परदेशी यांनी सावदा नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करणे, नियमानुसार निर्बीजीकरण आणि लसीकरण करणे, आक्रमक कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करणे, तसेच शाळा, बाजारपेठ, रुग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. मात्र, सात दिवसांच्या मुदतीत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू न झाल्यास येत्या १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सावदा शिवसेनेच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सूरज परदेशी यांनी दिला आहे. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणे सहन केले जाणार नाही. आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.



