



जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित (विसनजी नगर, जळगाव) यांची वार्षिक सर्वसाधारण सभा वाचनालय सभागृहात अत्यंत उत्साही व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेच्या वतीने अहवाल सालात दिवंगत झालेले देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी, क्रीडा, सहकार, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, सीमेवर धारातीर्थी पडलेले जवान तसेच संस्थेचे दिवंगत सभासद व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन रोहित दिलीपराव निकम यांनी संस्थेच्या आर्थिक वर्षातील यशस्वी कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. त्यांनी संस्थेचा प्रगती अहवाल सादर करताना सांगितले की, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सर्व कर्मचारी, संचालक मंडळ आणि सभासदांनी दाखवलेली तत्परता व जिद्द याच्या बळावरच संस्था आज प्रगतीपथावर आहे. भविष्यातही सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था विविध नवनवीन व शेतकरीकेंद्री उपक्रम राबवेल, असा ठाम विश्वास चेअरमन रोहित निकम यांनी व्यक्त केला.
सभेदरम्यान संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे व ज्येष्ठांचे आभार मानण्यात आले. यामध्ये खासदार पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, जळगाव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे चेअरमन निकम यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला जिल्हा बँक संचालिका शैलजाताई निकम, व्हाईस चेअरमन अरविंद भगवान देशमुख, संचालक यादवराव विष्णू पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, प्रताप हरी पाटील, सुधाकर दौलतराव पाटील, पुंडलिक दौलतराव पाटील, निळकंठ आनंदा नारखेडे, अरुण आत्माराम पाटील, रामनाथ चिंधू पाटील, संजीव मुकुंदराव पाटील, अरुण बाबुराव देशमुख, गजानन मल्हारराव देशमुख, प्रशांत लिलाधर चौधरी, विवेक राजाराम पाटील, शांताराम चंद्रा सोनवणे, मंगेश भरत पाटील, महिला संचालिका सोनलताई संजय पवार, श्वेतांबरी रोहित निकम, तज्ज्ञ संचालक अनिल रामदास पाटील, जिजाबराव भगवान धनगर, व्यवस्थापक विश्वनाथ पांडुरंग पाटील आणि सहव्यवस्थापक समरसेन निकम यांच्यासह मोठ्या संख्येने संस्था सभासद व हितचिंतक उपस्थित होते.



