
पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लहान वयातच आपल्या अफाट कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास त्यांचा उत्साह द्विगुणीत होतो. धुळे येथील एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आर्यन सुजितकुमार बाविस्कर याने एशियन शॉर्ट ट्रॅक ट्रॉफी २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी त्याचा विशेष सन्मान केला आहे.

आर्यनने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचे वृत्त वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर नेहमीच कौतुकाचा हात ठेवणाऱ्या सदानंद धडू भावसार यांनी आर्यनच्या यशाची माहिती मिळताच त्याला आपल्या निवासस्थानी निमंत्रित केले. यावेळी भावसार यांनी आर्यनला अभिनंदनपत्र, गौरवपत्र आणि ५०० रुपये रोख बक्षीस देऊन अत्यंत उत्साहात सन्मानित केले, तसेच भविष्यातही अशाच जिद्दीने देशाचे नाव जगात मोठे करण्याचे आशीर्वाद दिले.
याप्रसंगी बोलताना आर्यन व त्याच्या पालकांनी भावसार सरांचे मनःपूर्वक आभार मानले. लहान वयातील खेळाडूंच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याची भावसार सरांची सामाजिक व शैक्षणिक परंपरा नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. निवृत्त आदर्श शिक्षक सदानंद धडू भावसार हे आजवर तब्बल ११०० गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा असाच विशेष गौरव करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. शिक्षण, क्रीडा, कला व सामाजिक क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या बालकांना सातत्याने प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.



