
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डांभुर्णी येथे भर चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजता डांभुर्णी येथे एका व्यक्तीने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल अनिल साळुंखे व हितेश बागुल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबिन बिर्याणी दुकानाजवळ नुकत्याच झालेल्या गोळीबारातील एका राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना आढळून आली. तसेच परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता विकास जगन्नाथ सोळंके यानेच तेथे फायरींग केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी बोलावून रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.
गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना जळगाव येथे पाठवण्यात आले. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकानेही आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. संयुक्त शोध मोहिमेदरम्यान विकास उर्फ गोटू सोळंके याला रात्री सुमारे एक वाजता जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असल्याचे समोर आले. त्याचे कोळन्हावी परिसरात आदर्श हॉटेल, बिअर बार आणि परमिट रूम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डांभुर्णी येथील काही तरुण त्याच्या हॉटेल व बिअर बारमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याने त्यांना तो त्रास देत असल्याचे सांगण्यात आले. याच कारणावरून २६ ऑगस्ट रोजी संबंधित तरुणांसोबत आरोपीचे भांडण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने २७ ऑगस्ट रोजी रात्री डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी नमूद केले. गोळीबारासाठी वापरलेले हत्यार कोळन्हावी गावाच्या शिवारातील स्वतःच्या मालकीच्या आदर्श हॉटेलजवळील शेतात लपवून ठेवल्याची माहिती आरोपीने दिल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन झडती घेतली. यावेळी गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सफौ हेमंत सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग होता.



