Home क्राईम सावदा पोलिसांची धडक कारवाई! साडेदहा लाखांचा गुटखा व कार जप्त ; आरोपी...

सावदा पोलिसांची धडक कारवाई! साडेदहा लाखांचा गुटखा व कार जप्त ; आरोपी अटकेत

0
23


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर सावदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी राखाडी रंगाची होंडा अमेझ कार अडवून झडती घेतली. यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत गुटखा व तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, कारचालकाला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सावदा पोलिसांना प्रतिबंधित गुटख्याची राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री सुमारे ११ वाजून ४ मिनिटांनी संशयित होंडा अमेझ कार (एमएच-१९-सीव्ही-४४४५) तेथे येताच पोलिसांनी कार थांबवून तिची तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याच्याकडे चौकशी केली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे समोर आले. दोन पंचांच्या उपस्थितीत कारची झडती घेतली असता विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची पाकिटे मोठ्या प्रमाणात आढळून आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा विमल पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला. तसेच या प्रतिबंधित मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार, अंदाजे ५ लाख रुपये किमतीची, पोलिसांनी ताब्यात घेतली. अशा प्रकारे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख २७ हजार ७०० रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे. हा माल भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या प्रतिबंधित मालाच्या पुरवठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जयराम खोडपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय तडवी यांच्या पथकाने केली. सावदा पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेला साठा नेमका कोणाकडून आणण्यात आला आणि त्याच्या वितरणामागे आणखी कोण व्यक्ती किंवा व्यापारी सहभागी आहेत, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


Protected Content

Play sound