
पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजात राहताना गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने पुढे येण्याची गरज आहे. गरीब बालकांच्या पायाला लागणारा चटका आणि टोचणारा काटा हा प्रत्येक संवेदनशील मनाला लागला पाहिजे, तरच सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने जपली जाईल, असे मार्मिक व प्रतिपादन पारोळा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी केले. तालुक्यातील बोदर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक भावनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या कौतुकप्रसंगी त्या बोलत होत्या.

मूळचे अमळगाव (ता. अमळनेर) येथील रहिवासी आणि वेस्टर्न रेल्वे, मुंबई येथे वरिष्ठ यांत्रिक म्हणून कार्यरत असणारे प्रमोद राजेंद्र पाटील तसेच त्यांच्या पत्नी चेतना प्रमोद पाटील (महसूल सहाय्यक, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे) हे दांपत्य सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. चेतना पाटील यांचे एम.ए., डी.एड. पर्यंत शिक्षण झाले असून महसूल विभागात कार्यरत असतानाही शिक्षकी पिंडामुळे त्यांना जिल्हा परिषद शाळांविषयी विशेष जिव्हाळा आहे. बोदर्डे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला स्वातंत्र्य दिनाचा व्हिडिओ आणि मुख्याध्यापिका सुषमा पाटील व उपशिक्षिका माधुरी पवार यांचे शैक्षणिक कार्य पाहून, तसेच शाळेत मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील मुले शिकत असल्याचे समजताच पाटील दाम्पत्याने या बालकांसाठी पुढाकार घेतला.
विशेष म्हणजे, त्यांची १० वर्षांची कन्या कु. हरीश्री प्रमोद पाटील हिने आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुलीच्या या संवेदनशील विचाराला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत बोदर्डे शाळेतील सर्व ३५ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची पादत्राणे (बूट) आणि कपकेक वाटप केले. पायात नवीन बूट मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान उपस्थितांचे मन हेलावून टाकणारे होते. आई-वडिलांच्या सामाजिक संस्कारांचा वारसा चालवत लहान वयात कु. हरीश्रीने घेतलेला हा निर्णय सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी ठरला. पाटील दाम्पत्याचे सामाजिक कार्य केवळ एका शाळेपुरते मर्यादित नसून त्यांनी नुकतेच नानासाहेब खंडेराव पाटील मूकबधिर निवासी शाळा (देवगाव) येथील सर्व विद्यार्थ्यांना पादत्राणे उपलब्ध करून दिली आहेत, तसेच परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा (पारोळा) येथील बालकांना मिष्टान्न भोजन दिले आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी यांनी पाटील दाम्पत्याच्या या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक केले, तर मुख्याध्यापिका सुषमा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.



