Home Uncategorized यावलच्या विकासासाठी सत्ताधारी नगरसेवक एकवटले; ७ कोटींच्या निधीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावलच्या विकासासाठी सत्ताधारी नगरसेवक एकवटले; ७ कोटींच्या निधीची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
29


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील अल्पसंख्याकबहुल भागाच्या विकासाला गती देण्यासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी शहरातील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावल शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत यावेळी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. शहरातील अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाची कामे करण्यासाठी ७ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रतिभा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांचे सहकार्य लाभले. यावल शहरातील विकासकामांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी मिळावा आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष कदीर खान, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उमेश फेगडे, विद्यमान नगरसेवक हेमराज फेगडे उर्फ बाळूदादा तसेच भाजपाच्या गटनेत्या नंदा महाजन यांचे चिरंजीव उपस्थित होते. यावल शहराच्या विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावल शहरातील अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यास यावल शहरातील अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये विविध विकासकामे मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा मजबूत होण्यासोबतच नागरी सुविधांमध्ये सुधारणा होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावल शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याच्या या मागणीमुळे स्थानिक विकासकामांना गती मिळण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनाकडे आता यावलकरांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound