Home उद्योग स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी द्या अन् जिल्ह्याचा विकास साधा ; पालकमंत्री गुलाबराव...

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी द्या अन् जिल्ह्याचा विकास साधा ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे आवाहन

0
1

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणुकीला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, औद्योगिक भूखंड, दळणवळण व्यवस्था आणि निर्यातीच्या उत्तम संधी उपलब्ध असून जिल्ह्यातील उद्योजकांनी स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती द्यावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. एमआयडीसीतील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे उद्योग आयुक्तालय व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६’ चे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य पुरवले जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

या परिषदेला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, उद्योग सहआयुक्त वृषाली सोने, उपायुक्त संतोष गवळी व शेंदुर्णी नगर परिषदेचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख उद्योजक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत बोलताना पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, जळगावला विदर्भाच्या धर्तीवर ‘डी प्लस’ दर्जा देण्यास मंजुरी मिळाली असून त्याचा शासन निर्णय (GR) तातडीने काढण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या परिषदेदरम्यानच पालकमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला, ज्यावर उद्योगमंत्र्यांनी येत्या मंगळवारी बैठक घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यात सध्या चाळीसगाव, जामनेर आणि भुसावळ येथे १,००० हून अधिक औद्योगिक भूखंड उपलब्ध असून ८५ टक्के काम पूर्ण झालेले ‘उद्योग भवन’ लवकरच उद्योजकांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्र शासनाच्या निर्यातवाढ उपक्रमात जळगावचा समावेश झाल्याने केळी व कापूस या स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी जळगावातच उद्योग वाढवण्याचे आवाहन केले. विमानतळ विस्तार, समृद्धी महामार्ग जोडणी व रेल्वेच्या ३-४ थ्या लाईनमुळे लॉजिस्टिक्स अधिक मजबूत झाले असून ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ क्षेत्रात जिल्ह्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार सुरेश भोळे यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी ग्रामीण भागात ‘उद्योजकता विकास कक्ष’ सुरू करून ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या गुंतवणूक परिषदेत १०२ उद्योजकांनी उद्योग विभागासोबत १,४४५.६८ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर (MOU) स्वाक्षऱ्या केल्या असून यामुळे ४,७१६ नवीन रोजगारनिर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे. कराराचे वितरण करून सर्व उद्योजकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या परिषदांमधील ८० टक्के करारांची उद्दिष्टपूर्ती झाली असल्याने ही नवी गुंतवणूकही लवकरच प्रत्यक्ष धरावर उतरून जिल्ह्याचा औद्योगिक कायापालट करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound