Home Cities जळगाव पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन ; ५०० विद्यार्थ्यांना लाभ देण्याची...

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला निवेदन ; ५०० विद्यार्थ्यांना लाभ देण्याची मागणी

0
34

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्ती आणि नोंदणी प्रमाणपत्रासंदर्भातील विविध अडचणी तातडीने सोडवाव्यात, तसेच राज्यातील अधिकाधिक पात्र व गरजू संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

महाज्योती, नागपूर आणि सारथी, पुणे यांच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीतील विद्यार्थी निवड निकषांमुळे अनेक पात्र संशोधक विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. विशेषतः शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रावर असलेला ‘Provisional’ हा शब्द वगळून त्यांना नियमित Registration Certificate देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

अधिछात्रवृत्तीसाठी सध्या निश्चित करण्यात आलेली १०० विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ही संख्या वाढवून किमान ५०० पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाज्योती, नागपूर आणि सारथी, पुणे यांच्याकडे स्वतंत्र शिफारसपत्र पाठवून पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, अशी विनंतीही करण्यात आली.

अधिछात्रवृत्तीच्या नव्या निकषांबाबतही विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मांडल्या. पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ‘B+’ ग्रेडची अट, वयोमर्यादा तसेच NET, SET आणि PET या पात्रतांचा टप्प्याटप्प्याने विचार करण्याच्या निकषांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या संधीपासून वंचित राहावे लागू शकते, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. त्यामुळे अधिछात्रवृत्तीसाठी वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे ४५ वर्षे ठेवावी आणि NET, SET तसेच PET या तिन्ही पात्रतांना समान संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पदव्युत्तर पदवीतील ‘B+’ ग्रेडची अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे नियम लागू करावेत, जेणेकरून अधिकाधिक पात्र संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळू शकेल, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता, आकस्मिक खर्च आणि अन्य सुविधांमध्ये करण्यात आलेली कपात पुन्हा विचारात घेऊन पूर्वीप्रमाणे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

विद्यापीठ स्तरावर निर्माण झालेल्या अडचणी तातडीने दूर करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत महाज्योती आणि सारथी यांसारख्या संबंधित संस्थांकडे सकारात्मक शिफारस करण्यात यावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली. संशोधक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी विद्यापीठाने सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भाजपा जळगाव महानगरचे जिल्हा चिटणीस भूषण लाडवंजारी यांच्यासह पीएच.डी. संशोधक विद्यार्थी अनिल ज्ञानेश्वर हाडे, ॲड. राहुल वाकलकर, अनिल बाविस्कर, शिरीष तायडे, भूषण सोनवणे, भरत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भूषण लाडवंजारी यांनी राज्यातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री तसेच महाज्योती आणि सारथीच्या संबंधित कार्यालयांकडे निवेदने सादर करून अधिछात्रवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींचा तातडीने विचार करून संबंधित यंत्रणांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन लाडवंजारी यांनी केले. राज्यातील पात्र आणि गरजू पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीच्या निकषांमध्ये सुलभता आणणे, नोंदणी प्रमाणपत्रावरील ‘Provisional’ शब्द हटविणे, अधिछात्रवृत्तीची विद्यार्थी संख्या १०० वरून किमान ५०० करणे आणि वयोमर्यादा व पात्रता निकषांमध्ये शिथिलता देणे या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे निवेदन दिले असून, ऑनलाइन अर्जाची मुदत संपण्यापूर्वी संबंधित यंत्रणांकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound