नंदुरबार-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भाजपचे माजी महामंत्री आणि नंदुरबारचे नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाने कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने कारवाई करत चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले आहे.
व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप्समध्ये शासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच मंत्र्यांसोबतच्या संभाषणांचा दावा केला जात आहे. एका क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य असल्याचे समोर आले होते. मात्र, या सर्व क्लिप्स बनावट असून एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छेडछाड करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केला आहे.

दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप्सप्रकरणी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या असून, भाजपमधील अंतर्गत वादही या निमित्ताने चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर पक्षातील काही नेते व कार्यकर्त्यांकडून चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती. अखेर भाजपने अधिकृत पत्रक जारी करत विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
या कारवाईमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, कथित ऑडिओ क्लिप्सचा पुढील तपास आणि त्यामागील सत्य काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



