अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते या मदत वाटपाचा प्राथमिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. सुमारे १७०० पेक्षा अधिक बाधित कुटुंबांना प्रत्येकी एक किराणा किट देण्यात आले.
आमदार अनिल पाटील यांनी शहरातील विविध मदत केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन बाधित कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच बाधित कुटुंबांना शासनाकडून पुढील आठवड्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होण्याचे संकेत दिले. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पंचनामे करण्यात आल्यानंतर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून किराणा किट वाटपाचे आदेश पारित करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाच्या माध्यमातून मदत वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्यासोबत प्रांताधिकारी मयूर भंगाळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बाधित नागरिकांना मदत मिळविण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील आठ विविध ठिकाणी वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली होती. भोई समाज मंगल कार्यालय, पैलाड, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, ताडेपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गांधलीपुरा, संत सखाराम महाराज वाडी, शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा, क्षत्रिय कांचमाळी पंचमढी, बहादरपूर नाका रोड, शिवम कुटी बोर्डाजवळ, झामी चौक तसेच विद्या विहार कॉलनी गेटजवळील केंद्रावर किराणा किटचे वाटप करण्यात आले. मदत वाटपाच्या प्रक्रियेत प्रत्येक बाधित कुटुंबाला एक किराणा किट देण्यात आले. वाटपाची प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी लाभार्थ्यांचा फोटो घेण्यात आला तसेच किट प्राप्त झाल्याबाबत लाभार्थ्यांची स्वाक्षरीही घेण्यात आली. त्यामुळे मदत प्रत्यक्ष बाधित कुटुंबांपर्यंत पोहोचल्याची नोंद प्रशासनाकडे राहणार आहे.
दरम्यान, काही बाधित कुटुंबांची नावे मदतीच्या यादीत नसल्याचे आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आले. याची तत्काळ दखल घेत आमदारांनी प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून या कुटुंबांनाही लवकरात लवकर किराणा किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी नगरसेवक भरतकुमार ललवाणी, शोभाबाई गढरे, नरेंद्र संदानशिव, विजय कहारु पाटील, सचिन पाटील, देवेंद्र कांबळे, मुक्तार खाटीक, संजय कौतिक पाटील, विजय पाटील, दुर्गेश पाटील, विनोद लांबोळे, देविदास महाजन, दिनेश शेलकर, शांताराम महाजन, प्रविण महाजन, गंगाराम महाजन, भूषण भदाणे, वेद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



