Home धर्म-समाज धीरज परदेशी हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ; करणी सेनेचे प्रशासनाला निवेदन

धीरज परदेशी हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी ; करणी सेनेचे प्रशासनाला निवेदन

0
6

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजपूत समाजबांधव स्व. धीरज परदेशी यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळ्याचे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे तसेच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. धीरज परदेशी हत्याप्रकरणाचा निष्पक्ष, जलद आणि सखोल तपास करण्यात यावा, तसेच आरोपींवर कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्यानुसार, स्व. धीरज परदेशी यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना असून, या घटनेमुळे राजपूत समाजामध्ये तीव्र दुःख, संताप तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कोणत्याही दबाव अथवा हस्तक्षेपाशिवाय निष्पक्षपणे तपास पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली.

आरोपींविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोरातील कठोर कलमांनुसार गुन्हेगारी कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका करणी सेनेने मांडली. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत आरोपी दोषी ठरल्यास त्यांना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यासोबतच पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, तसेच कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य आणि संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखून दोषींवर कायद्यानुसार कारवाई झाल्यास पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. निवेदन देतेवेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. शुभांगी राजपूत, जिल्हा सरचिटणीस प्रदीप राजपूत, पारोळा तालुकाध्यक्ष रुपेशकुमार राजपूत, ग्रामीण तालुकाध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष सोनुसिंग राजपूत यांच्यासह राजपूत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound