Home Cities अमळनेर अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई ; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, एकाला अटक

अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई ; मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, एकाला अटक

0
20

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात अमळनेर पोलिसांना यश आले असून, चोरीची मोटारसायकल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल तसेच आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात हरेश गंभीर चौधरी, रा. श्रीराम कॉलनी, शिरूड नाका, अमळनेर यांनी त्यांच्या हिरो होंडा सीडी डीलक्स मोटारसायकल क्रमांक एमएच-१९-एक्यू-२१६२ चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. सुमारे २५ हजार रुपये किमतीची ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना विनायक उखा पाटील, रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव हा चोरीच्या मोटारसायकली विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज़ यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस हवालदार प्रमोद पाटील तसेच पोलीस अंमलदार नरेश बडगुजर, नितीन मनोरे आणि उज्वल पाटील यांचा समावेश होता.

पथकाने विनायक उखा पाटील याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून फिर्यादी हरेश गंभीर चौधरी यांच्या मालकीची चोरी झालेली हिरो होंडा सीडी डीलक्स मोटारसायकल क्रमांक एमएच-१९-एक्यू-२१६२ जप्त करण्यात आली. यासोबत आणखी एक मोटारसायकलही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून, संशयिताला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलीबाबतही पोलिसांकडून तपास केला जात असून, तिच्या चोरीशी संबंधित बाबी समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound