अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विजयादशमीच्या उत्सवी वातावरणात अमळनेर नगरपरिषदेतर्फे मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रुबजी नगर, बहादरपूर रोड येथे सायंकाळी ७ वाजता हा सोहळा होणार असून, या कार्यक्रमातून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत्याच्या विजयाचा संदेश दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत. विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होणार असून, नागरिकांना एकत्र येऊन सणाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय संस्कृतीत रावणदहनाला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून सत्याचा आणि धर्माचा विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून हा सोहळा साजरा केला जातो. वाईट प्रवृत्ती, अहंकार आणि अधर्माचा त्याग करून सत्याच्या मार्गाने वाटचाल करण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो. अमळनेर नगरपरिषदेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



