Home Cities एरंडोल शास्त्री फार्मसीचा ९७ टक्के निकाल; ७९ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास-डिस्टिंक्शन

शास्त्री फार्मसीचा ९७ टक्के निकाल; ७९ विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास-डिस्टिंक्शन

0
12

पळासदळ, एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार फार्मसी शिक्षणाची संधी देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ या संस्थेने पुन्हा एकदा उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DBATU) अंतर्गत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ मधील अंतिम वर्ष बी. फार्मसीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयाने तब्बल ९७ टक्के निकाल नोंदविला आहे.

या परीक्षेला महाविद्यालयातील एकूण १०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल ७९ विद्यार्थ्यांनी फर्स्ट क्लास-डिस्टिंक्शन मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत, प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित शैक्षणिक उपक्रम, अभ्यासातील सातत्य आणि महाविद्यालयाने निर्माण केलेले सकारात्मक शैक्षणिक वातावरण या यशामागील प्रमुख घटक ठरले.

या निकालात भूमिका लोटन पटवारी हिने ५५० पैकी ४५४ गुण मिळवत SGPA ९.०९ प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे भूमिका ही पळासदळ गावातील रहिवासी लोटन पटवारी यांची कन्या असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही गुणवत्तेची कमतरता नसते, याचे ती प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

उदय ज्ञानेश्वर चव्हाण याने ५५० पैकी ४४२ गुण व SGPA ८.५५ मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तर मृणाल दुर्गादास कोल्हे आणि तेजस्विनी राजेंद्र पाटील यांनी प्रत्येकी ४४१ गुण व SGPA ८.५५ मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे फार्मसी शिक्षण उपलब्ध व्हावे, त्यांना शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज भासू नये आणि ग्रामीण भागातूनही सक्षम व गुणवंत फार्मसी पदवीधर घडावेत, या उद्देशाने डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांनी पळासदळ येथे महाविद्यालयाची स्थापना केली. विद्यापीठीय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी सातत्याने मिळविलेल्या यशामुळे संस्थेच्या या शैक्षणिक संकल्पनेला बळ मिळाले आहे.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी, दिशा आणि मार्गदर्शन मिळाले, तर ते कोणत्याही स्तरावर यश संपादन करू शकतात,” हा संदेश या निकालातून अधोरेखित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल डॉ. विजय शास्त्री व सचिव रूपा शास्त्री यांनी समाधान व्यक्त करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचा विश्वास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. अभ्यासक्रमातील विषयांचे सखोल अध्यापन, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, नियमित मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासावर दिला जाणारा भर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

या उल्लेखनीय निकालाबद्दल व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी आणि एचओडी प्रा. जावेद शेख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 


Protected Content

Play sound