Home क्राईम शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई ; देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे...

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई ; देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त ; एक अटकेत

0
21

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात शनीपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे अवैधरित्या बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, १० ऑगस्ट २०२६ रोजी शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपीजवळ एका इसमाकडे अवैध अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी करून कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांनी घटनास्थळी संशयित प्रकाश तोलार, रा. खेडी, ता. जळगाव, हल्ली मुक्काम साई सिटी, जळगाव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे व योगेश जाधव, पोलीस नाईक महेंद्र पाटील व पराग दुसाने, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे आणि योगेश साबळे यांचा समावेश होता.


Protected Content

Play sound