जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध गोद्री धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी साडेएकच्या सुमारास घडली. आकाश सुनील पडघान (वय २५, रा. भादोला, जि. बुलढाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आकाश हा आपल्या महाविद्यालयातील पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मंगळवारी तो आपल्या पाच ते सहा मित्रांसह गोद्री धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. धबधब्याच्या परिसरात पोहण्याचा आणि पावसाळी निसर्गाचा आनंद घेत असताना त्याचा अचानक पाय घसरला आणि तो उंचावरून खोल दरीत कोसळला.

या अपघातात आकाश गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी धैर्य दाखवत त्याला सुमारे एक किलोमीटर अंतर खांद्यावरून बाहेर आणले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला फत्तेपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलविण्याचा सल्ला दिला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी रुग्णालयात व घटनास्थळी पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे आकाशच्या मित्रांवर शोककळा पसरली असून, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गमावल्याने पडघान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भादोला परिसरातही या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात गोद्री धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, घसरडे खडक, खोल दरी आणि वेगवान पाण्याचा प्रवाह यामुळे पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



