Home Cities जळगाव इतिहासाची गोडी वाढवणाऱ्या ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

इतिहासाची गोडी वाढवणाऱ्या ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी बालनाट्य दिनानिमित्त बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि व.वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘इतिहास महाराष्ट्राचा’ ही विशेष स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बालकांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि ऐतिहासिक विषयांवर स्वतः संहिता तयार करून कलात्मक सादरीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावर्षीच्या स्पर्धेसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. या विषयावर बालकलावंतांनी नाट्यछटा, स्वगत, नाटुकले, पोवाडा, गीतगायन आणि एकपात्री अभिनय अशा विविध कलाप्रकारांद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रभावी परिचय करून दिला. लहान वयातील स्पर्धकांनी दाखविलेली अभ्यासपूर्ण तयारी, अभिनय कौशल्य आणि ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण यामुळे उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कलावंत प्रतिमा धर्माधिकारी-याज्ञिक आणि सचिन महाजन यांनी केले. त्यांनी प्रत्येक सादरीकरणातील अभिनय, विषयाची मांडणी, संवादफेक, सादरीकरणाची परिणामकारकता आणि ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन केले.

कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व.वा. जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल शहा, सदस्य महेश गोरडे, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी तसेच कोषाध्यक्ष सचिन महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेत एकल (वय ५ ते १० वर्षे) गटात १० बालकलाकारांनी, एकल (वय ११ ते १५ वर्षे) गटात १५ बालकलाकारांनी, तर समूह गटात ७ संघांनी सहभाग नोंदविला. तीनही गटांमध्ये स्पर्धकांनी आपल्या अभिनय कौशल्यासह इतिहासाचे प्रभावी सादरीकरण करत परीक्षकांची दाद मिळवली.

निकालात एकल (वय ५ ते १० वर्षे) गटात हृदया अनिल चव्हाण (चाळीसगाव) हिने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले. गायत्री अशोक पवार हिला उत्कृष्ट, महेश्वरी योगेश पाटील हिला उत्तम, तर ईशिका शरीफ तडवी हिला प्रशंसनीय पुरस्कार मिळाला. एकल (वय ११ ते १५ वर्षे) गटात वैष्णवी ज्ञानेश्वर पाटील हिने सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला. साक्षी अनिल पाटील हिला उत्कृष्ट, गौरवी महेंद्रसिंग राजपूत हिला उत्तम आणि चैताली सुभाष चव्हाण हिला प्रशंसनीय पुरस्काराने गौरविण्यात आले. समूह गटात ललिता वाणी माध्यमिक विद्यालय, जळगाव यांनी सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले, तर कमल वाणी बालनिकेतन विद्यालय, जळगाव यांनी उत्कृष्ट पारितोषिक मिळविले. विजेत्या बालकलावंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांसह व.वा. जिल्हा वाचनालयाचे एका वर्षाचे निःशुल्क सभासदत्वाचे गिफ्ट कार्ड प्रदान करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त बालकलाकारांना ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या बालकलावंतांसाठी राज्यस्तरीय व्यासपीठ गाठण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषदेचे सदस्य सुदर्शन पाटील, हर्षल पवार, दर्शन गुजराती, ज्ञानेश्वर सोनवणे, अवधूत दलाल, भालचंद्र पाटील तसेच व.वा. जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound