Home Cities जळगाव नशिराबादच्या ‘या’ गणेशोत्सव मंडळाने साकारला पावनखिंडीचा जाज्वल्य इतिहास

नशिराबादच्या ‘या’ गणेशोत्सव मंडळाने साकारला पावनखिंडीचा जाज्वल्य इतिहास

0
27


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासातील शौर्यगाथा आणि मावळ्यांचे अतुलनीय बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने नशिराबाद येथील द्वारका नगर मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त पावनखिंडीच्या इतिहासावर आधारित भव्य व आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. ऐतिहासिक प्रसंगांची प्रभावी मांडणी करण्यात आल्याने हा देखावा गणेशभक्त आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा या देखाव्यातून साकारण्यात आली आहे. विशेषतः बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळ्यांनी पावनखिंडीत दिलेल्या अतुलनीय लढ्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा देखाव्याच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. पावनखिंडीच्या लढ्याचा इतिहास केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून सादर करण्याऐवजी त्यामागील शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेची जाणीव नव्या पिढीला व्हावी, हा मंडळाचा मुख्य उद्देश आहे. देखाव्यात ऐतिहासिक प्रसंगांची करण्यात आलेली आकर्षक मांडणी आणि सादरीकरणामुळे भेट देणाऱ्या नागरिकांना त्या काळातील इतिहासाची अनुभूती मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न द्वारका नगर मित्र मंडळाकडून करण्यात आला आहे. पावनखिंडीतील शौर्यगाथा आणि मावळ्यांचे बलिदान यामुळे तरुण पिढीला इतिहासातून प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या आकर्षक ऐतिहासिक देखाव्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने नागरिक आणि गणेशभक्त हा देखावा पाहण्यासाठी भेट देत आहेत. नशिराबादकरांनी पावनखिंडीवरील हा देखावा आवर्जून पाहावा, असे आवाहन मंडळाचे सचिव ललित महाजन यांनी केले आहे.


Protected Content

Play sound