Home Cities भुसावळ फेकरी ग्रामपंचायतीवरचे आरोप बिनबुडाचे; पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी खुलासा करणार – प्रशासक चेतना...

फेकरी ग्रामपंचायतीवरचे आरोप बिनबुडाचे; पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी खुलासा करणार – प्रशासक चेतना भिरूड

0
5

फेकरी ता. भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या पाच ते सात दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासनाची आणि गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून सुरू असल्याचा आरोप करत माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत प्रशासक चेतना भिरूड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत करण्यात येणारे आरोप पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व बाबींचा पुराव्यानिशी खुलासा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चेतना भिरूड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील तथाकथित सेवानिवृत्त वर्ग-1 अधिकारी विठ्ठल तायडे यांनी माध्यमांद्वारे ग्रामपंचायत प्रशासनावर विविध प्रकारचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र संबंधितांना ग्रामपंचायतीच्या योजना, विकासकामे किंवा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती नसताना केवळ गाव आणि ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्रामपंचायत प्रशासन हे महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणारे असून भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून सर्व कामे पारदर्शकपणे केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासनावर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालय आणि अभ्यासिकेबाबत करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. वाचनालय केवळ दहा बाय पाच चौरस फुटांच्या खोलीत सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी तो वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात वाचनालयासाठी सुमारे वीस बाय वीस चौरस फुटांची प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

चेतना भिरूड यांनी पुढे सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी महिला सरपंच म्हणून गावाचा कारभार सांभाळला असून सध्या प्रशासक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत एका महिला लोकप्रतिनिधीला लक्ष्य करून विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भातील सर्व बाबी, विकासकामांचे तपशील आणि संबंधित कागदपत्रांसह लवकरच पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व आरोपांना पुराव्यानिशी उत्तर देण्यात येईल, असेही चेतना भिरूड यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound