रायपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात दिंडी काढत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून टाकला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी “देह विठ्ठल, देह विठ्ठल, विठ्ठल झाला” या भक्तिगीतावर रिंगण स्वरूपातील आकर्षक समूह नृत्य सादर केले. यावेळी श्री विठ्ठल, रुक्मिणी, मुक्ताई, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज तसेच वारकरी यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान . सौ. भारती परदेशी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी अर्थात देवशयनी एकादशीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होत असून या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे या दिवसाला “देवशयनी एकादशी” असेही संबोधले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी आषाढी एकादशीचे विशेष स्थान असून लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पोहोचतात. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि विठ्ठलभक्तीमुळे मनाची शुद्धी, आत्मिक समाधान आणि पुण्यप्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

कार्यक्रमात गजेंद्र परदेशी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा याविषयी मार्गदर्शन केले. आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीची जाण ठेवावी आणि परंपरांचा अभिमान बाळगावा, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक संस्कृती, सण-उत्सव, संत परंपरा आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनाली देसले मॅडम, सौ. मयुरी वाघ मॅडम, कु. शिवानी पाटील, ऋषिकेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. दिंडीसाठी बेलगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच श्री जितेंद्र तायडे यांनी विद्यार्थ्यांना राजगिऱ्याच्या लाडूंचे वाटप केले. पालकांनीही उत्स्फूर्त सहकार्य करत कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संस्कृतीची ओळख, संतांच्या विचारांचा वारसा आणि वारकरी परंपरेचे महत्त्व बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा भक्तिमय सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.



