जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता मंदिर चौफुली ते खोटे नगर स्टॉपदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात मध्यबिंदू (सेंटर पॉईंट) योग्य पद्धतीने न ठेवल्यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला मनोज काळे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून संबंधित रस्त्याचे नव्याने सर्वेक्षण करून काँक्रीटीकरणाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी २४ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सन २०१९ ते २०२२ या कालावधीत जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर चौफुली ते खोटे नगर स्टॉप या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम करताना महामार्गाच्या मध्यबिंदूचे (Center Point) अचूक पालन करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अजिंठा चौफुली, इच्छादेवी मंदिर, आकाशवाणी चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची उजवी व डावी बाजू असमतोल दिसून येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापौरांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, आता संबंधित रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करून मध्यबिंदू निश्चित करण्यात यावा. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंमध्ये समतोल अंतर राहील आणि भविष्यात वाहतुकीच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या अडचणी टाळता येतील.

पत्रानुसार, इच्छादेवी मंदिर परिसरात सध्या महामार्गाच्या एका बाजूला अत्यल्प जागा शिल्लक राहिली असून, दुसरीकडे पोलीस चौकी परिसरात सुमारे ३० मीटर जागा उपलब्ध आहे. या असमतोलामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थापन आणि भविष्यातील विकासकामांमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी बाब महापौरांनी निदर्शनास आणून दिली आहे. महापौरांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याचे नव्याने मोजमाप व सर्वेक्षण करावे आणि त्यानुसार काँक्रीटीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्राची प्रत NHAI च्या प्रादेशिक अधिकारी व मुख्य अभियंता, नवी मुंबई यांनाही पाठविण्यात आली आहे.



