यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात घुसून वस्तीगृहाच्या गृहपालाला धमकावणे, धक्काबुक्की करणे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, यावल-चोपडा रोड येथे २३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता तसेच २४ जुलै रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान साहील संजय तडवी व रोहन साहील तडवी यांनी गृहपाल जावेद तडवी यांचा रस्ता अडवून त्यांची कॉलर पकडली, शिवीगाळ केली व दमदाटी केली. “आम्हाला वस्तीगृहाचे कॉन्ट्रॅक्ट देत नाही, तू इथे नोकरी कशी करतो?” अशी धमकी देत धक्काबुक्की केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर दोन्ही आरोपी आदिवासी विकास कार्यालयात आले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर मोठ्याने आरडाओरड करत कार्यालयातील शांतता भंग केली. “सर्व काम बंद करा, बाहेर निघून जा,” असे म्हणत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीचा शोध घेत असताना साक्षीदार राकेश अहीरे यालाही शिवीगाळ करून गळा पकडत बाहेर ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसमोर अश्लील हावभाव करून त्यांना लज्जा वाटेल असे वर्तन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित आरोपी वारंवार मद्यधुंद अवस्थेत येऊन त्रास देत असून फिर्यादीच्या जीवितास धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन २४ जुलै रोजी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.



