Home धर्म-समाज जर्मनीत आषाढी वारीचा गजर ; नारखेडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

जर्मनीत आषाढी वारीचा गजर ; नारखेडे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

0
55

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातासमुद्रापारही वारकरी संप्रदायाचा भक्तिरंग अधिकाधिक खुलत असल्याचे प्रेरणादायी चित्र जर्मनीमध्ये पाहायला मिळत आहे. फैजपूर येथील डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांचे सुपुत्र विक्रांत नरेंद्र नारखेडे यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात आषाढी वारीनिमित्त दिंडी-पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. भारतीय भाविकांना एकत्र आणत संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

स्टुटगार्टमध्ये वास्तव्यास असलेले विक्रांत नारखेडे यांनी तेथील भारतीय नागरिक आणि वारकरी भाविकांना एकत्र करून संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांची पालखी तयार केली आहे. या पालखीच्या माध्यमातून शहरात सप्ताहभर दिंडीचे आयोजन करण्यात आले असून, वारकरी परंपरेची ओळख परदेशातही जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या सप्ताहभर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात प्रत्येक मुक्कामस्थळी विठ्ठल नामजप, हरिपाठ आणि सामूहिक भक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच भारतीय तरुण, विद्यार्थी आणि नव्या पिढीला वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी वारीचे महत्त्व, पंढरपूरचे धार्मिक महात्म्य आणि संत परंपरेचा समाजजीवनावर झालेला प्रभाव याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. यासोबतच अन्नदानाचा उपक्रमही राबविला जात असून, भारतीय संस्कृती आणि सेवाभावाचा संदेश दिला जात आहे.

या उपक्रमामुळे सातासमुद्रापार भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचत असल्याने सांप्रदायिक मान्यवरांनी त्याचे विशेष स्वागत केले आहे. परदेशात राहूनही भारतीय परंपरा, संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा जपण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. या उपक्रमासाठी विक्रांत नारखेडे यांना त्यांच्या पत्नी सौ. प्रज्ञा नारखेडे तसेच जर्मनीतील अनिवासी भारतीय भाविकांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे स्टुटगार्टमध्ये आषाढी वारीचा उत्साह अनुभवायला मिळत असून, भारतीय संस्कृतीचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचत आहे.

या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे, दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, गायन गंधर्व पंढरीनाथ आरु, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोळे, मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र हरणे, मुक्ताई मंदिराचे अध्यक्ष रवींद्र (भैया) पाटील, विश्वस्त शरद महाजन, धनंजय चौधरी, अनिल नारखेडे, भास्कर नारखेडे, सुनील नारखेडे आणि किरण चौधरी यांनी विक्रांत नारखेडे व सहभागी भाविकांचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound