Home Cities धरणगाव आश्रम शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात 

आश्रम शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात 

0
10

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेची जाणीव निर्माण करण्यासह पारंपरिक आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनात प्रत्येक रानभाजीची ओळख, तिच्यातील पौष्टिक घटक, औषधी गुणधर्म, आरोग्यदायी फायदे तसेच दैनंदिन आहारातील उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सविस्तर माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक अन्नसंपदा आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमात शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दगडू सूर्यवंशी आणि एम. एच. चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक अन्नपदार्थांचे जतन करणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक अमोल जाधव यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, आरोग्याविषयी जागरूकता आणि पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन करण्याची भावना विकसित होत असल्याचे नमूद केले. शालेय शिक्षणासोबतच जीवनोपयोगी ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती एम. बी. तडवी, चेतन वाघ, सुवर्णा महाजन, अनिता माळी, दिनेश वाडीले आणि तेजस्विनी चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश वाडीले यांनी केले, तर आभार प्रदर्शन चेतन वाघ यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीपूर्ण प्रदर्शनाचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.


Protected Content

Play sound