जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. EPFO ने आपल्या अधिकृत वेबसाइटवरून युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ॲक्टिव्हेशन आणि नवीन UAN जनरेट करण्याची सुविधा बंद केली असून, या दोन्ही सेवा आता ‘उमंग’ (UMANG) ॲपवर उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) अनिवार्य करण्यात आले आहे.
EPFO च्या माहितीनुसार, डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर ऑनलाइन सेवा अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सदस्यांना UAN संबंधित सर्व प्रक्रिया UMANG ॲपद्वारेच पूर्ण कराव्या लागणार आहेत.

UAN सक्रिय झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठी सदस्यांनी UMANG ॲपमधील ‘UAN Services Through Face Auth’ या विभागात जाऊन ‘UAN Allotment and Activation’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर UAN क्रमांक, आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक भरून संमती बॉक्सवर टिक करावा व ‘Send OTP’ वर क्लिक करावे. प्रक्रिया यशस्वी झाल्यास स्क्रीनवर “The UAN entered is already activated” असा संदेश दिसेल.
दरम्यान, अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी EPF ठेवींवर 8.25 टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. सलग तिसऱ्या वर्षी सदस्यांना 8.25 टक्के दराने व्याज मिळणार असल्याने लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
याशिवाय EPFO ने पैसे काढण्याच्या नियमांबाबतही स्पष्टता दिली आहे. विद्यमान नियमांनुसार, सदस्यांनी त्यांच्या EPF खात्यात किमान 25 टक्के शिल्लक कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोकरी सुरू असताना अंशतः पैसे काढताना एकूण निधीपैकी जास्तीत जास्त 75 टक्के रक्कमच काढता येते. संपूर्ण रकमेचे सेटलमेंट मात्र नोकरी सोडल्यानंतरच मंजूर केले जाते.
उदाहरणार्थ, एखाद्या सदस्याच्या EPF खात्यात कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचा मिळून 2 लाख रुपये जमा असतील, तर तो अंशतः पैसे काढताना जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये काढू शकतो. उर्वरित 50 हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक राहील. एकूणच, EPFO च्या या नव्या बदलांमुळे UAN व्यवस्थापन अधिक सुरक्षित होणार असून, सदस्यांनी आवश्यक सेवा मिळवण्यासाठी UMANG ॲपचा वापर करणे आता अनिवार्य ठरणार आहे.



