यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येत्या ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यात उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. आदिवासी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत भव्य उत्सव साजरा करण्यासाठी यावल तालुका जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी भालोदचे सरपंच प्रदीप कोळी, तर उपाध्यक्षपदी निकिता कोळी (फैजपूर) आणि दीपक कोळी (यावल) यांची निवड करण्यात आली आहे.
यावल शेतकी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी टोकरे, ढोर, महादेव आणि मल्हार कोळी समाज बांधवांची बैठक समाजाचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे वढोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक आदिवासी दिन उत्सवाचे नियोजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजबांधवांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने उत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे आणि ९ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. तसेच समाजातील ऐक्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी जितेंद्र सपकाळे, रोहन सोनवणे (जळगाव), हरलाल कोळी (रावेर) आणि नामदेव कोळी यांनी समाजातील विविध प्रश्न, शैक्षणिक प्रगती, सामाजिक संघटन आणि युवकांच्या सहभागाबाबत मार्गदर्शन केले. आगामी कार्यक्रम अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
उत्सव समितीच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रदीप कोळी, उपाध्यक्षपदी निकिता कोळी आणि दीपक कोळी, खजिनदारपदी खेमचंद कोळी, प्रसिद्धी प्रमुखपदी गोकुळ कोळी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून नितीन कोळी (रावेर), मुरलीधर कोळी (भुसावळ), राज पाटील (भुसावळ), भागवत कोळी (तांदळवाडी), किरण कोळी (तासखेडा), नितीन कोळी (दहिगाव), वाल्मीक कोळी (राजोरा), धनराज कोळी (यावल), कैलास सपकाळे (अंजाळे), दीपक कोळी (किनगाव), कुणाल सोनवणे (बामणोद), शांताराम इंगळे (चोपडा), नितीन कोळी (अंजाळे), रोहिदास कोळी (पिंप्री), भागवत कोळी (अंजाळे), महेश नन्नवरे (यावल), नामदेव कोळी (पाडळसा), गोपाळ कोळी (यावल) आणि भरत कोळी (यावल) यांची निवड करण्यात आली.
बैठकीला यावल तालुक्यातील प्रविण कोळी, संदीप सोनवणे, प्रकाश कोळी, पद्माकर कोळी, अनिल कोळी, नितीन कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविक खेमचंद कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन सपकाळे यांनी मानले.
९ ऑगस्ट रोजी रेणुका देवी मंदिर, यावल येथून पारंपरिक वेशभूषा, सजीव देखावे आणि आदिवासी पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणासह भव्य रॅली काढण्यात येणार असून ती आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत जाणार आहे. या उत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
यावल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यासाठी समितीने नियोजनाला सुरुवात केली असून, समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग या उत्सवाला अधिक भव्य स्वरूप देणार असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.



